पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यात रेल्वे ब्रीजच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या २५ फूट खोल खड्ड्याने एका तरुणाचा बळी घेतला आहे. रात्रीच्या अंधारात दुचाकी थेट खड्ड्यात कोसळल्याने २५ वर्षीय विकी निकम याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेले दोन मित्र जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून रेल्वे ब्रीजच्या कामावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. रेल्वे ब्रीजच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात दुचाकी कोसळली. या अपघातात खडकदेवळा येथील २५ वर्षीय विकी संजय निकम याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुचाकीवरील त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत.
या घटनेने निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विकीच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. कुटुंबाचा आधार असलेल्या विकीच्या मृत्यूने आईचा आधारच हिरावला गेला आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे अंत झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. या संदर्भात पाचोरा पोलीस ठाण्यात कुठलेही नोंद करण्यात आलेली नाही.



