अमळनेर प्रतिनिधी | विरोधात साक्ष देत असल्याच्या रागातून चौघांनी संगनमत करून एका व्यक्तीला वाळूच्या डंपरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील नांद्री गावात घडली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास बसस्थानकासमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरचालकाला अटक करण्यात आली आहे. अन्य तिघे फरार आहेत.
फिर्यादी ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांच्या म्हणण्यानुसार, २८ ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टरचा धक्का लागल्याच्या कारणावरून विपुल गोसावी, सागर गोसावी, संजयगिर गोसावी आणि मयूर बोरसे यांनी त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तलाठ्यांच्या पंचनाम्यावेळी शरद रतन पाटील हे साक्षीदार झाले होते. याचाच राग मनात धरून विपुल याने शरद यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
३१ ऑक्टोबरच्या रात्री शरद पाटील हे काही जणांसोबत नांद्री बसस्थानकाजवळ थांबले असताना राखाडी रंगाच्या कारमधून विपुल, मयूर आणि सागर तेथे आले. त्यानंतर डंपर क्रमांक (एचआर ३७ डी ८९५७) घेऊन चालक भरत सुभाष पाटील घटनास्थळी आला. यावेळी चौघांनी शरद यांना डंपरखाली चिरडण्यास सांगितल्याचा आरोप आहे. विपुल आणि मयूर यांनी शरद यांना डंपरसमोर ढकलले. त्यानंतर चालकाने डंपर त्यांच्या अंगावर घातला. या भीषण घटनेत शरद यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी धुळे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील यांनी रुग्णालयात भेट देत उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत केली. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि डीवायएसपी विनायक कोते यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पाठलाग करून बुधगाव येथे डंपर पकडत चालकाला अटक केली. अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एपीआय गणेश अहिरे करीत आहेत.



