जळगाव प्रतिनिधी | मुलीला सासरी पाठवण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून जावयाने सासऱ्याला मारहाण केल्याची घटना जळगाव तालुक्यातील बांभोरी येथे घडली. यावेळी सासऱ्याच्या पत्नी आणि मुलालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय भिमराव जाधव (वय ४२, व्यवसाय हमाली, रा. सुरेशदादा जैन नगर, कुसुंबा खुर्द, ता. जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांचा जावई चंद्रकांत ईश्वर बाविस्कर (रा. बांभोरी, ता. जळगाव) हा १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी आला होता.
यावेळी तो पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी आला असता, फिर्यादी यांच्या मुलीने सासरी जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने जावयाने सासऱ्याच्या डोक्यात, पाठीवर आणि पायावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच फिर्यादी यांच्या पत्नी व मुलालाही शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या घटनेप्रकरणी १ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.



