
ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने घेतला तिघी बहिणींचा बळी ;
जळगाव | देशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडली आहे. पालकांनी ऑनलाईन गेम खेळण्यास विरोध केल्यानंतर तिघींनीही इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाखी (१२), प्राची (१४) आणि विंशिका (१६) या तीन बहिणींना कोरोना लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन गेमिंगचे तीव्र व्यसन जडले होते. त्या एका कोरियन ‘टास्क-बेस्ड’ ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्या होत्या. या व्यसनामुळे त्या नियमित शाळेतही जात नव्हत्या. तिन्ही बहिणी एकमेकींवर अतिशय प्रेम करत होत्या. जेवण, झोप आणि दैनंदिन व्यवहारही त्या नेहमी एकत्रच करत असत.
बुधवारी (दि. ४) पहाटे सुमारे दोनच्या सुमारास गाझियाबादमधील ‘भारत सिटी’ या निवासी टाऊनशिपमधील नवव्या मजल्यावरून तिघींनी उडी घेतली. पालकांनी ऑनलाईन गेम खेळण्यास मज्जाव केल्याने नाराज झालेल्या तिन्ही बहिणींनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत मुलींचे वडील चेतन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुली अनेक दिवसांपासून हा धोकादायक ऑनलाईन गेम खेळत होत्या. तपासात एक धक्कादायक बाब समोर आली असून, १४ वर्षांची प्राची ही त्या गेमची ‘लीडर’ होती. तीच इतर दोन बहिणींना सूचना देत असे. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून, त्यावर केवळ “Mummy Papa Sorry” असे लिहिले आहे.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी निमिष पाटील आणि एसीपी अतुल कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मुलींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांना हा गेम खेळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या अज्ञात ‘कंट्रोलर’ किंवा लिंकचा शोध पोलीस घेत आहेत. या आत्महत्येमागे केवळ गेमिंगचा विरोध कारणीभूत आहे की अन्य काही बाबी आहेत, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


