
जाळपोळ व दहशत निर्माण करणाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश
भडगाव : पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नगरदेवळा येथे एका महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावल्याची गंभीर घटना घडली होती. सदर कृत्यामुळे परिसरात निर्माण झालेले दहशतीचे वातावरण आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास चक्र फिरवून मुख्य सूत्रधारासह आरोपींना निष्पन्न करून अटक केली आहे.
पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु. र. नं. ५७/२०२६ कलम भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (ग) फिर्यादी- किरण उमेश राऊळ व त्यांची आई घरात झोपलेल्या असताना, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली व परिसरात दहशत निर्माण केली. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने आरोपी गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देताना आपला साथीदार समाधान बळीराम निकम याच्या मदतीने हे कृत्य केल्याचे मान्य केले.
तपासात या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार फिर्यादीचा पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) असल्याचे समोर आले. राहुल पाटील आणि त्याची पत्नी किरण राऊळ यांच्यात न्यायालयात वाद सुरू असून, कोर्टान राहुलला दरमहा २०, ०००/- रुपये पोटगी (खावटी) देण्याचे आदेश दिले होते. याचा सूड उगवण्यासाठी राहुलने आरोपींना २ लाख रुपयांची सुपारी दिली.
आरोपी गणेश पाटील याच्या सखोल चौकशीतून त्याने विविध जिल्ह्यांतून मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून एकूण ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.


