
चाकणकर अन् चौधरींचे व्यावसायिक कनेक्शन उघड
अशोक खरात प्रकरण रूपाली चाकणकर यांना चांगलेच भोवले असून त्यांना राज्य महिला आयोगपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून देखील त्यांची हकालपट्टी केली गेली. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना देखील लक्ष केले जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर आणि चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुनील तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या रायगडमधील रोहयात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे. आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी भागीदारीमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून रोहयाच्या रोठ खुर्द येथे बहुमजली इमारत उभी केली आहे. आकाश चौधरी यांच्या नावावर ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड रिव्हर राफ्टीग, कर्जत रिव्हर राफ्टीग, गीता अॅग्रो अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, FL3 हॉस्पिटॅलिटी, रॉक हिल अडव्हेचर रिसॉर्ट आणि कर्मा कन्स्ट्रक्शन हे मोठे व्यवसाय नोंदणीकृत आहे.
रूपाली चाकणकर आणि आकाश चौधरी यांच्या रोहयातील इमारत बांधकाम प्रकरणी अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिकसुद्धा दाखल केली आहे. अनधिकृत चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याची ही केस असून यामुळे चाकणकर यांचा चौधरी यांच्यासोबत रायगडमध्ये व्यवसाय सुरू असल्याचा आरोपाला पुष्टी मिळत आहे.


