
मनवेल ता. यावल विविध कार्यक्रमांचे आयोजन : भाविकांमध्ये उत्साह
मनवेल ता. यावल : जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रा उत्सवाला ३१ मार्चपासून सुरुवात होत असून २ एप्रिलपर्यंत तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेनिमित्त होमहवन, पूजा-अर्चा, धार्मिक विधी तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कोळन्हावी व शिरागड या दोन्ही गावांच्या मध्यभागी, तापी नदीलगत उंच टेकडीवर वसलेले श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जळगाव जिल्ह्यात या ठिकाणाला “लहान गड” म्हणून ओळखले जाते.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गड “मोठा गड” म्हणून प्रसिद्ध असून, शिरागड येथील मंदिराला त्याच्याशी निगडित मानले जाते. भाविकांच्या मते, येथे येऊन देवीचे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होऊन सुख-समृद्धी लाभते. त्यामुळे वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते.यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी घामणगाव फाट्यापासून मनवेल मार्गे शिरागड गडापर्यंत रस्ता, वीज व पाण्याची व्यवस्था संस्थामार्फत करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष योगेश सोळंके, सचिव प्रतापदादा सोनवणे, सरपंच योगिता सोनवणे, शांताराम सोळंके तसेच शिरागड गावातील तरुण मंडळी परिश्रम घेत आहेत. साकळी पोलीस चौकीचे हवालदार अर्जुन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील सुधाकर सांळुखे बंदोबस्तासाठी सहकार्य करत आहेत.


