
स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे.
जळगाव । स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. पोलिसांच्या या कारवाईत चोरीस गेलेल्या २ लाख १० हजार रुपये किमतीच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने चोरट्यांमध्ये खळबळ उडाली.
याबाबत असे की, दिनांक ०६ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अंमलदार शहरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गुप्त माहिती मिळाली की, इराणी मोहल्ला भागातील रजा टॉवर परिसरात काही संशयास्पद दुचाकी उभ्या आहेत. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन खातरजमा केली असता, तेथे तीन महागड्या दुचाकी आढळून आल्या. या गाड्यांच्या मालकांबाबत शोध घेतला असता कोणीही समोर आले नाही.
सदर दुचाकी पोलीस स्टेशनला आणून त्यांचे इंजिन आणि चेसिस नंबर तपासले असता, या गाड्या मुक्ताईनगर, चोपडा आणि अहिल्यानगर (तोफखाना) येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत या गाड्या हसन अली उर्फ आशू नियाज अली इराणी आणि सलमान अली हुजूर अली इराणी (दोघे रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) यांनी चोरी करून त्या ठिकाणी लावल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईत पल्सर १२५, बजाज पल्सर N-160 आणि KTM Duke 250 या तीन दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण अंदाजे किंमत २ लाख १० हजार रुपये इतकी आहे. सदर प्रकरणात पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन करीत असून चोरीच्या आणखी घटनांबाबत आरोपींकडून माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
यांनी केली कारवाई?
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेंद्र रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बावचळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.


