
या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
चोपडा : शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी पहिल्याच दिवशी धडाकेबाज कारवाई करत बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास गिरिराज लॉन्सजवळील पत्री शेडमध्ये, अकुलखेडा शिवार, ता. चोपडा येथे बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी रविंद्र दिनकर पाटील (वय 40), राजवर्धन संजय पाटील (वय 31) आणि कपिल संजय पाटील (वय 30) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बनावट व मानव जीवनास धोकादायक ठरणारी दारू तयार करून ती नामांकित कंपनीच्या नावाने विक्रीसाठी तयार करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
कारवाई दरम्यान पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला असून त्यात बनावट दारू, रिकाम्या बाटल्या, झाकण, रसायनयुक्त द्रव्य, तसेच इतर साहित्याचा समावेश आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1 लाख 8 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या या कारवाईमुळे पोलीस निरीक्षक पवन देसले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


