जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानराज पार्क ते खोटेनगर परिसरात शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई करत समांतर रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली. या कारवाईदरम्यान एका महिलेने पथकाशी हुज्जत घालत वाद घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने कारवाई सुरू ठेवत अनेक टपऱ्या, हातगाड्या आणि वाहने जप्त केली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली जात आहे. त्याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून मानराज पार्क ते खोटेनगर दरम्यान जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दुकाने, टपऱ्या, हातगाड्या तसेच रस्त्यांवर उभी असलेली वाहने हटवून जप्त करण्यात आली. कारवाईदरम्यान एका अतिक्रमणधारक महिलेने पथकासोबत वाद घातल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कारवाई सुरळीतपणे पूर्ण केली.
या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून महापालिकेच्या मोहिमेला अधिक तीव्रता मिळाली आहे. दरम्यान अतिक्रमणधारकांनी स्वखुशीने अतिक्रमणे हटवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अतिक्रमण विभागाकडून करण्यात आले आहे.



