Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»‘मिशन मनपा’साठी महायुतीचा मास्टरस्ट्रोक 

ताज्या बातम्या

‘मिशन मनपा’साठी महायुतीचा मास्टरस्ट्रोक 

Editorial DeskBy Editorial DeskDecember 27, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र; जागावाटपाचा फार्म्युला ठरला

जळगाव प्रतिनिधी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीने ‘मिशन मनपा’साठी अखेर एकत्रित रणनिती निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या गोपनीय चर्चांनंतर जळगाव महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रित लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून, जागावाटपाचा ४६-२२-७ असा फार्म्युला ठरल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात काल भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची   बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सखोल चर्चा होऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर एकमत झाले. या बैठकीला भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तसेच राष्ट्रवादीकडून राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती होती. त्यामुळे या निर्णयाला वरिष्ठ पातळीवरूनही मान्यता असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, भाजप ४६, शिवसेना २२ आणि राष्ट्रवादी ७ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. याआधी भाजप आणि शिवसेना यांच्यात ५५-२५ अशा जागावाटपावर चर्चा झाली होती. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्याने भाजपला काही पावले मागे घ्यावी लागली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेष म्हणजे, मागील महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर ५७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी भाजप ५० पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, एकहाती सत्तेचे गणित यावेळी कठीण ठरण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला राहिल्याने भाजपाने यावेळी अधिक समंजस भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून समविचारी पक्षांना सोबत घेऊन सर्वपक्षीय आघाडीचे आवाहन करण्यात आले होते. यानंतर महायुतीतील हालचालींना वेग आला.

युती जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली असली, तरी जागावाटपाबाबत तीनही पक्षांकडून सध्या गुप्तता पाळण्यात येत आहे. मात्र ४६-२२-७ या सूत्रावरच अंतिम निर्णय होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीची ताकद आणि विरोधकांची रणनिती यामुळे जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काही दिवसांत अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add