भुसावळ प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून भुसावळ शहरात निर्माण झालेला कचऱ्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे घंटागाड्यांसाठी डिझेलचा पुरवठा पूर्ववत झाला असून, रात्रीपासूनच शहर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील ७२ तासांत शहरातील संपूर्ण कचरा संकलन पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.
मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरातील सद्यस्थितीवर भाष्य केले.
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने निर्माण झालेली राजकीय अस्थिरता आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. नगरपरिषदेची देयके थकीत असल्याने पेट्रोल पंप चालकाने डिझेल देणे बंद केले होते, ज्यामुळे घंटागाड्या थांबल्या होत्या आणि शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते.
या संकटाची दखल घेत मंत्री सावकारे यांनी तातडीने पंपचालकाशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले, त्यानंतर डिझेल पुरवठा सुरू झाला. नगरसेवक पिंटू कोठारी आणि महेंद्रसिंग ठाकूर यांनी आरोप केला की, गेल्या आठ वर्षांपासून सुरळीत असलेली व्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाअभावी कोलमडली आहे. ‘माझी वसुंधरा’ योजनेत गौरवल्या गेलेल्या शहरात आज अशी स्थिती ओढवणे दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. राजकीय पेचप्रसंग न्यायालयात असला तरी, जनतेला नागरी सुविधा पुरवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असा विश्वास यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.



