जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चाळीशी पार गेला असून, प्रशासनाने दिलेला ‘येलो अलर्ट’ आता जीवावर बेतू लागला आहे. संसाराची नवी स्वप्ने डोळ्यात घेऊन अवघ्या २० दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या वैशाली सुनील भील (मोरे) या नवविवाहितेचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील सुनील भील यांच्याशी वैशालीचा विवाह २३ मे २०२६ रोजी झाला होता. लग्नाची धामधूम संपते न संपते तोच, वैशाली पतीसोबत चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी तिथून परतल्यानंतर तिला थकवा जाणवू लागला आणि अचानक प्रकृती बिघडली. गुरुवारी दुपारी वैशालीला तीव्र ताप आला आणि ती घरातच बेशुद्ध पडली.
कुटुंबीयांनी तातडीने तिला नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
जळगाव जिल्ह्यात सध्या ‘मे हिट’चा तीव्र तडाखा बसत आहे. लग्नाचा थकवा, प्रवास आणि वाढत्या तापमानामुळे वैशालीला उष्माघाताचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. “तीव्र तापानंतर बेशुद्ध अवस्थेत तिला रुग्णालयात आणले होते, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल,” असे वैद्यकीय अधीक्षिका डॉ. योगिता बावस्कर यांनी सांगितले. ऐन उमेदीच्या काळात एका नवविवाहितेचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.



