यावल प्रतिनिधी । यावल शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता चक्क बसस्थानक परिसरातून भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवासी, विशेषतः महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवाशी मिनाक्षी जितेंद्र पाटील (वय ३०) या १२ मे रोजी काही वैयक्तिक कामासाठी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास यावल बसस्थानक परिसरात आल्या होत्या. बसस्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ होती. याच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने मिनाक्षी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अत्यंत शिताफीने तोडून चोरून नेली. या पोतमध्ये सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वाट्या आणि तीन मणी होते.
दागिने चोरीला गेल्याचे काही वेळाने मिनाक्षी पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र चोरटा तोवर पसार झाला होता. अखेर त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुनील पाटील हे करीत आहेत.



