जळगाव प्रतिनिधी | धावत्या ट्रेनमध्ये एक ३० वर्षीय अज्ञात पुरुष इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर, त्याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, रेल्वे पोलिसांनी नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार १८ मे रोजी ट्रेन नंबर ११०३१ अमृत भारत एक्सप्रेसच्या पाठीमागून सहाव्या जनरल डब्यात एक तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती जळगाव रेल्वे स्टेशनचे ऑन ड्युटी स्टेशन मास्टर मोरे यांनी संध्याकाळी ६ वाजता रेल्वे पोलिसांना दिली. ती ट्रेन रात्री ७ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर आली असता, रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्या बेशुद्ध इसमाला प्लॅटफॉर्मवर उतरवले. त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले.
मात्र, रात्री ७:३० वाजण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. सध्या सदर अनोळखी मयताचे प्रेत ओळख पटवण्यासाठी जळगाव शासकीय रुग्णालयाच्या शवगृहात राखून ठेवण्यात आले आहे. या वर्णनाचा कोणताही नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती असल्यास त्यांनी जळगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अंमलदार पोहेकॉ किरण वसंत बारी यांनी केले आहे.



