जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहर आणि परिसर भागात सार्वजनिक ठिकाणी, वाहनांमध्ये तसेच वाईन शॉपच्या बाहेर उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी धडक मोहीम राबवली आहे. या धडक कारवाईत तब्बल ६२ तळीरामांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून ही धडक मोहीम राबविल्याने जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा वचक निर्माण झाला आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव महानगर जिल्ह्याच्या वतीने पोलिसांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि गर्दीच्या भागात गटागटाने बसून मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. विशेषतः गिरणा टाकीसारख्या गजबजलेल्या भागात भाजीपाला व इतर खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना, माता-भगिनींना आणि सर्वसामान्य नागरिकांना या मद्यपींच्या उपद्रवामुळे प्रचंड मानसिक त्रास आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागत होता.
या गंभीर समस्येची दखल घेत पोलीस प्रशासनाने अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले. पोलिसांनी केवळ उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांनाच रस्त्यावर बसवून कडक समज दिली नाही, तर ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्यांवरही मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांवर आणि टवाळखोरांवर निश्चितच वचक बसेल आणि महिलांना शहरात सुरक्षित वातावरणात वावरता येईल, असा विश्वास महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नितू परदेशी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका उज्वला बेंडाळे, ल रेखा वर्मा, संगीता पाटील, ज्योती पालीवाल आणि नंदिनी पद्माकर या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरीयुक्त पत्राद्वारे पोलिसांच्या या मोहिमेचे स्वागत केले असून, शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम अशीच पुढेही सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



