जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून विविध हॉटेल्स आणि लॉजवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावात उघडकीस आली आहे. लग्नाची मागणी केली असता तरुणीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी मूळची जळगावची असून, सध्या ती नोकरीनिमित्त पुण्याच्या वारजे भागात वास्तव्यास आहे. या दरम्यान तिची ओळख संशयित आरोपी रोशन मुकेश निकम (वय ३३, रा. निमखेडी, जळगाव) याच्याशी झाली. रोशनने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. मार्च २०२४ ते मे २०२६ या कालावधीत त्याने जळगावमधील वेगवेगळ्या लॉज आणि हॉटेल्समध्ये तरुणीच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
काही दिवसांपूर्वी पीडितेने रोशनकडे लग्नाबाबत तगादा लावला. मात्र, त्याने लग्नास साफ नकार दिला. याच दरम्यान रोशनचे दुसऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे पीडितेच्या निदर्शनास आले. याबाबत तिने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने जळगाव गाठून शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी रोशन निकम याच्याविरुद्ध बलात्कार, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.



