भुसावळ प्रतिनिधी । ई-फार्मसीचे बेकायदेशीर संचालन, कॉर्पोरेट कंपन्यांची मक्तेदारी आणि ऑनलाईन औषध विक्रीमुळे धोक्यात आलेले सार्वजनिक आरोग्य यांविरोधात अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला भुसावळ शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज तालुक्यातील सर्व औषध दुकाने कडकडीत बंद राहिल्याने संपूर्ण औषध बाजारपेठ ठप्प झाली होती.
गेल्या काही वर्षांत देशात ऑनलाईन औषध विक्रीचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढले आहे. या ई-फार्मसी मंचांवरून कोणतीही ठोस शहानिशा न करता, बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे किंवा थेट प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची सर्रास विक्री होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक केमिस्ट संघटनेने केला आहे. यामुळे औषधांचा, विशेषतः ‘अँटीबायोटिक्स’चा प्रचंड गैरवापर वाढला असून, रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “औषधे ही ग्राहकोपयोगी सामान्य वस्तू नसून, त्यांच्या विक्रीसाठी कठोर कायदेशीर नियंत्रण आणि तज्ज्ञ फार्मसिस्टची थेट देखरेख अनिवार्य आहे. मात्र, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या निव्वळ नफेखोरीसाठी सरकारी नियमांना हरताळ फासत आहेत.” यासोबतच व्यापाऱ्यांवर लादल्या जाणाऱ्या काही जाचक सरकारी अधिसूचना तातडीने मागे घेण्यात याव्यात, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.
आजच्या या एक दिवसीय आंदोलनामुळे औषध पुरवठा बंद राहिल्याने रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची काही अंशी गैरसोय झाली; मात्र हा लढा दीर्घकालीन जनआरोग्याच्या सुरक्षेसाठीच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. केंद्र सरकारने ई-फार्मसीच्या या अनियंत्रित कारभारावर तातडीने कायदेशीर लगाम न लावल्यास, आगामी काळात देशभरासह भुसावळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भुसावळ केमिस्ट संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.



