जळगाव प्रतिनिधी | आगामी पावसाळा तोंडावर आलेला असताना जळगाव शहरात ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील अत्यंत अडचणीच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘बाबा खोली’ परिसरातील नाल्याची रविवारी (२४ मे) मनपा आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. या धडक मोहिमेत सुमारे तीन ट्रॅक्टर इतका प्रचंड गाळ काढण्यात आला असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
या नाल्याच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती आणि घरे आहेत. अत्यंत दाटीवाटीचा परिसर असल्याने या नाल्याची साफसफाई करण्यासाठी यंत्रसामग्री नेण्यास अजिबात जागा शिल्लक नव्हती. पावसाळ्यात हा नाला तुंबून घरात पाणी शिरण्याची भीती असल्याने स्थानिक नागरिकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे याबाबत धाव घेत तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या समस्येचे गांभीर्य ओळखून महापौरांनी तातडीने आरोग्य विभागाला या नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करण्याचे आदेश दिले.
महापौरांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने रविवारी सकाळी ७ वाजेपासूनच या परिसरात मोहीम हाती घेतली. जागेची तीव्र अडचण असतानाही, कर्मचाऱ्यांनी दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल ६ तास सलग काम केले. या मोहिमेत सुमारे १ किलोमीटर लांबीच्या मोठ्या गटारीमधील साचलेला संपूर्ण गाळ आणि कचरा उपसण्यात आला. स्वच्छता काम सुरू असताना स्वतः महापौर दीपमाला काळे यांनी बाबा खोली परिसरात भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली व सूचना दिल्या.
या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाचे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मंजू पवार यांच्यासह बीव्हीजी (BVG) कंपनीचे ठेकेदार आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून काही दिवसांनी पुन्हा एकदा या नाल्याची साफसफाई केली जाईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.



