चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने नागद रोडवरील एका पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन करण्यात आले. शासनाने तालुक्यातील इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करावा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल पंपावर आलेल्या नागरिकांना आणि वाहनधारकांना ‘मेलडी चॉकलेट’ वाटप करून केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.
सध्या शेती मशागत, नांगरणी आणि आगामी पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा ऐन हंगामाच्या काळातच डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधनासाठी शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पेट्रोल पंपांवर रात्र-रात्रभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी संतप्त ग्राहक आणि पेट्रोल पंप चालकांमध्ये तीव्र वादाचे प्रसंग घडत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आधीच वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडलेला शेतकरी इंधन टंचाईमुळे अधिकच संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवसेना उबाठाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला.
आंदोलन संपल्यानंतर मागण्यांचे सविस्तर निवेदन संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने या इंधन तुटवड्यावर तातडीने ठोस उपाययोजना करून पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.



