जळगाव प्रतिनिधी | केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क (इम्पोर्ट ड्युटी) रद्द केल्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “केंद्र सरकार झोपेत निर्णय घेत आहे का?” असा संतप्त सवाल करत, सरकारच्या या धोरणामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ‘एक्स’ (ट्विटर) पोस्ट शेअर करत सरकारला धारेवर धरले.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, केंद्र सरकारने अचानक कापसावरील आयात शुल्क रद्द केल्यामुळे खुल्या बाजारात कापसाच्या दरात प्रति क्विंटल तब्बल १००० ते १५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. एकीकडे देशाचे प्रमुख स्वतः सांगतात की देशासमोर मोठे आर्थिक संकट येणार आहे, आणि दुसरीकडे याच संकटाच्या काळात देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी अडचणीत ढकलण्याचे काम सरकार करत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
”आपल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून बाहेरच्या शेतकऱ्यांसाठी जेवणाच्या पंगती बसवायची ही अक्कल सरकारला कोणी दिली कुणास ठाऊक?” अशी जळजळीत टीका खडसे यांनी केली. यासोबतच त्यांनी देशातील इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असतानाही, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसाआड वाढत आहेत. सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट (VAT), सरचार्ज आणि इतर कर कमी करून सामान्य जनतेला मोठा दिलासा देऊ शकते. पण सरकारला ही बुद्धी सुचत नाही, अशी टीका त्यांनी केली. सरकारला सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी बाहेरून येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यात जास्त रस असल्याचा टोलाही त्यांनी शेवटी लगावला. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे.



