जळगाव प्रतिनिधी | राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गेल्या वर्षभरापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात निर्माण करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, राबविण्यात आलेले विविध नावीन्यपूर्ण उपक्रम आणि झालेल्या एकूणच विकासकामांच्या मूल्यमापनासाठी एक उच्चस्तरीय तपासणी पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम यांच्या अध्यक्षतेखालील या पथकात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक जळगाव जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी असून, विविध तालुक्यांमधील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामांची कसून पाहणी करत आहे.
या दौऱ्याच्या सुरुवातीला, मंगळवार २ जून रोजी पथकाने जिल्ह्यातील चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्याला भेट दिली. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड व बोरखेडा या गावांमध्ये जाऊन पथकाने विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे आणि आसनखेड बुद्रुक या गावांमध्येही विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
गावांमध्ये झालेल्या कामांचा दर्जा आणि प्रशासकीय पारदर्शकता यावर पथकाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान, आज बुधवार ३ जून रोजी हे मूल्यमापन पथक धरणगाव आणि अमळनेर तालुक्यातील निवडक गावांना भेटी देऊन तेथील कामांची पाहणी करणार आहे. पुढील चार दिवस चालणाऱ्या या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण विकासकामांचा ताळेबंद तपासला जाणार असून, या मूल्यमापनानंतर पथक आपला अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. या दौऱ्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनाची धावपळ उडाली आहे.



