जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या (४ जून) शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, रिंगणात केवळ ४ उमेदवार आमनेसामने ठाकले आहेत. या लक्षवेधी निवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
पक्षांतर्गत बंडखोरी आणि रणनीतीचा भाग म्हणून आज विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत व डमी उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये अजित पवार गटाचे आसिफ मोहम्मद, सुनील जंगले आणि प्रवीण पाटील; ठाकरे गटाचे निलेश चौधरी; तसेच शिंदे गटाचे दीपक धांडे यांनी आपले अर्ज मागे घेतले. याशिवाय जावेद इकबाल, सचिन चौधरी, निलेश झोपे, कलीम खान, हितेंद्र देशमुख आणि घृष्णेश्वर पाटील, डॉ. दानिश शेख या अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे.
आता मैदानात उरलेले ४ प्रमुख शिलेदार:
नंदकिशोर महाजन – भारतीय जनता पार्टी (भाजपा)
शरद आबा शामराव तायडे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
रेश्मा काळे – बंडखोर उमेदवार (नगरसेविका, जळगाव)
अनिल चौधरी – अपक्ष उमेदवार (भुसावळ)
१२ उमेदवारांच्या माघारीमुळे आता ही निवडणूक चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून भाजपाचे नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे शरद आबा तायडे यांच्यात मुख्य लढत मानली जात असली, तरी जळगावच्या नगरसेविका रेश्मा काळे यांची बंडखोरी आणि भुसावळचे अनिल चौधरी यांचे अपक्ष आव्हान यामुळे या निवडणुकीतील चुरस कमालीची वाढली आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या अटीतटीच्या लढतीकडे लागले आहे.



