वरणगाव प्रतिनिधी | वरणगावजवळ एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा रस्ते अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेसह आणि एका वर्षाच्या चिमुरडीसह एकूण चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. मलकापूर येथील एकाच आदिवासी कुटुंबातील हे चारही सदस्य होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील रहिवासी असलेले विजय शंकर काळे (वय १९), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि अवघ्या एक वर्षाची चिमुरडी मोनालिसा शिवबसप्पा भोसले हे सर्वजण दुचाकीने वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होते. मात्र, वरणगाव गावाच्या थोडे पुढे जाताच, समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील चारही जण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
अपघाताचा आवाज ऐकून घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. नागरिकांनी दुचाकीची ओळख पटवून तात्काळ त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, डॉक्टरांनी तपासणी अंती चौघांनाही मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी आणि समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. एकाच वेळी कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यांचा काळीज चिरणारा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नातेवाईकांची समजूत काढली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, अपघात करून पळून गेलेल्या संबंधित वाहनचालकाचा शोध सुरू आहे. फरार चालकाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा, अशी आर्त मागणी मृतकांच्या संतप्त नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मलकापूर आणि वरणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.



