जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक व साठवणुकीस पूर्णपणे प्रतिबंधित असलेला एकूण २८ लाख ६१ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये लाखो रुपयांचा विमल सुगंधित गुटखा आणि एका चारचाकी मालवाहू वाहनाचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या डिझो पेट्रोलपंप परिसरात पाळत ठेवून संशयित वाहनाची तपासणी केली. संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी ‘महिंद्रा बोलेरो पिकअप’ (MH 19-CX 3260) हे वाहन थांबवले. वाहनाची झडती घेतली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या ‘विमल सुगंधित गुटखा’ आणि पानमसाल्याच्या तब्बल ५८ गोण्या आढळून आल्या.
या कारवाईत २१ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि ७ लाख रुपये किंमतीची बोलेरो पिकअप असा एकूण २८ हजार ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहन चालक जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.



