भुसावळ प्रतिनिधी | मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील ‘खान्देश लाईव्ह न्यूज’चे संपादक संतोष खंडू शेलोडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संतोष शेलोडे यांच्या पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई येथे ९ जून रोजी मराठी पत्रकार संघाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले.
या अधिवेशनात संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश सचिव हरीभाऊ प्रक्षाळे आणि प्रदेश संघटक संदीप पारोळेकर यांच्या हस्ते शेलोडे यांना जिल्हाध्यक्षपदाचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे राज्यपाल जिष्णू देव, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रसिद्ध आध्यात्मिक वक्ते स्वामी गौर गोपाल दास यांसारख्या अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुसावळ येथून संतोष शेलोडे यांच्या निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी कमलेश चौधरी, श्याम गोविंदा, वसंत कोलते, विनोद गोरधे आणि किशोर सावळे या पत्रकारांनीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संतोष शेलोडे यांनी सर्वांचे आभार मानले. भविष्यातील आपल्या कामाची दिशा स्पष्ट करताना ते म्हणाले, “जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. तसेच, पत्रकारितेचे कर्तव्य बजावताना पत्रकारांवर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरुद्ध आणि हल्ल्यांविरुद्ध मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आक्रमकपणे आवाज उठवला जाईल.” शेलोडे यांच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधव, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.



