जळगाव प्रतिनिधी | शहरातील अवैध सट्टा व दारू व्यवसायावर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी विशेष मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच प्रशिक्षणार्थी विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुरुवारी ११ जून पहाटे सुमारे ६ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये अचानक छापेमारी केली. यामध्ये मकरा टॉवर परिसर, गुजरात पेट्रोल पंप परिसर तसेच हरी विठ्ठल नगर रोड येथील संशयित ठिकाणांची तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित भागांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती.
अवैध सट्टा व दारू व्यवसायाशी संबंधित हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी विविध ठिकाणी चौकशी, पडताळणी आणि तपासणीची प्रक्रिया राबविली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या कारवाईत पोलीस कर्मचारी अवेश शेख, प्रणय पवार, सचिन साळुंखे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.



