जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहराच्या नजीक असलेल्या मानराज पार्क भागात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगावकडून बांभोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या या धडकेत रिक्षाचालकासह एक महिला प्रवासी गंभीररीत्या जखमी झाली आहे. कारचालकाने रस्त्यात अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून बांभोरीच्या दिशेने (एमएच १२ टीवाय १७६२) क्रमांकाची कार जात होती. मानराज पार्कजवळ अचानक कारचालकाने गाडीचे ब्रेक दाबले. कार अचानक रस्त्यामध्ये थांबल्यामुळे, अगदी तिच्या पाठीमागून येणारी (एमएच १९ सीडब्ल्यू ६८७७) क्रमांकाची भरधाव रिक्षा थेट कारवर जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात रिक्षाचालक आणि रिक्षात प्रवास करणाऱ्या पाळधी येथील एक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी तातडीने धाव घेत जखमींना रिक्षातून बाहेर काढले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलेही नोंद करण्यात आलेली नाही.



