रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील थेरोळे गावात अवैध दारू विक्री आणि हातभट्ट्यांच्या वाढत्या सुलतानी प्रकारांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. गावातील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने ही धडक मोहीम राबवून बेकायदेशीर दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.
या धडक कारवाईदरम्यान पथकाने हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणावर असलेला कच्चा माल, साहित्य आणि तयार दारूचा साठा जागीच जप्त करून तो पूर्णपणे नष्ट केला. गावातील तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवणे, अनेक कुटुंबांमधील सुख-शांती आणि स्वास्थ्य अबाधित राखणे, तसेच संपूर्ण गावाला व्यसनमुक्त करून एक निरोगी वातावरण उपलब्ध करून देणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
या महत्त्वपूर्ण कारवाईच्या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, थेरोळे गावचे पोलीस पाटील, तसेच गावच्या तरुण मित्र परिवारातील सक्रिय सदस्य निवृत्ती पाटील, पुष्पक पाटील व हर्षल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांच्या सांघिक समन्वयामुळे ही मोहीम यशस्वी झाली असून, ग्रामस्थांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
“दारूमुक्त थेरोळे – सुरक्षित थेरोळे” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत आणि सर्व गावकरी पूर्णपणे कटिबद्ध आहेत. गावात यापुढेही जर कुठे अवैध दारू विक्री किंवा हातभट्टी सुरू असल्याचे आढळल्यास त्याची तात्काळ माहिती प्रशासनाला देऊन कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
— शुभम पुंडलिक पाटील, सरपंच (ग्रामपंचायत थेरोळे)



