जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी नगरसेवक आणि नगराध्यक्षांना संबोधित करत, जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रथमच प्रचार मेळाव्यात उपस्थिती लावली. मेळाव्यापूर्वी प्रमुख नेत्यांची कोर कमिटीची बैठकही पार पडली.
मेळाव्यात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “या निवडणुकीत पक्षाचे काम आता सोपे झाले आहे. येथील ५४ अपक्ष उमेदवार हे कोणत्याही इतर पक्षाचे नसून ते आपल्याच महायुतीचे आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून महायुतीचा उमेदवार विजयी होईल, यात शंका नाही.” तसेच, निधी वाटपाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ७० टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार आमदारांना असून, त्यांनी आपल्या क्षेत्रातील नगरसेवकांना निधी उपलब्ध करून द्यावा. विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर उमेदवाराने छोट्या नगरपरिषदांच्या विकासाकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सुचवले.
त्यानंतर संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या रोखठोक भाषणात नगरसेवकांना कडक सूचना दिल्या. ते म्हणाले, “विरोधी पक्षाला जळगाव जिल्ह्यात आता स्थानच उरलेले नाही. आपल्याकडे एकूण ५५० मते आहेत. सर्वांनी सकाळी १० वाजेच्या आत १०० टक्के मतदान पूर्ण करावे. एकही मतदान बाद होणार नाही, याची काळजी घ्या. जे नगरपरिषद प्रशासन १० वाजेच्या आत संपूर्ण मतदान करेल, त्यांना सरकारकडून विशेष निधी किंवा बक्षीस दिले जाईल.” तसेच निवडणुकीच्या काळात कोणीही बाहेरगावी जाऊ नये, अशी ताकीदही त्यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. चव्हाण म्हणाले की, राज्यातील १७ जागांवर महायुती अनुकूल स्थितीत असून जळगावची निवडणूक ही केवळ एक औपचारिकता उरली आहे. या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी उपस्थित होते.



