जळगाव प्रतिनिधी | उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरू झाल्या असून, जिल्हाभरात उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सावखेडा सिम व डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या निरागस स्वागताने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर काही क्षणांसाठी भारावून गेल्या होत्या. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि हा दिवस संस्मरणीय व्हावा, यासाठी दोन्ही शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातून सजविलेल्या बैलगाडीवरून विद्यार्थ्यांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये सीईओ नायर स्वतः सहभागी झाल्या. मिरवणूक शाळेत पोहोचल्यानंतर त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
सावखेडा सिम येथील शाळेत एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. येथील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कु. कोमल सोनवणे या विद्यार्थिनीने थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली. करिश्मा नायर यांनीही तत्काळ होकार देत तिच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले. कोमलने स्वतःच्या हस्ताक्षरात तयार केलेल्या प्रश्नांच्या आधारे अत्यंत आत्मविश्वासाने ही मुलाखत घेतली. तिच्या या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले. या सोहळ्यात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, केंद्रप्रमुख विजय ठाकूर, मुख्याध्यापक संदीप पाटील, शिक्षक नामदेव सूर्यवंशी, आशा तडवी, धीरज तायडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मीना तडवी व इतर शिक्षक-ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



