जळगाव प्रतिनिधी | शासनाकडून जळगाव महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी देण्यात येणारा 2025-26 या आर्थिक वर्षाचा निधी अद्यापही अनेकांना मिळालेला नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रखडलेला निधी तातडीने वितरित करावा, या मागणीसाठी दिव्यांग सेनेच्या नेतृत्वाखाली सुमारे 100 दिव्यांग बांधवांनी मंगळवारी 16 जून रोजी जळगाव महानगरपालिकेच्या पाचव्या मजल्यावर ठिय्या आंदोलन केले.
दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी या प्रश्नासंदर्भात महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी 15 जूनपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, मुदत उलटूनही अनेक दिव्यांगांना निधी मिळालेला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधवांनी प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत रखडलेला निधी तातडीने वितरित करण्याची मागणी केली. शासनाने आणि महापालिका प्रशासनाने दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष भरत रामा जाधव यांनी सांगितले की, संध्याकाळपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा न झाल्यास दिव्यांग सेना आणि आंदोलनात सहभागी दिव्यांग बांधव महापालिका परिसरात आमरण उपोषण सुरू करतील. या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनासमोर रखडलेल्या निधीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



