चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, एका संशयित इसमासह चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत सुमारे ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राहुल सुभाष भिसे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने चोरीची मोटारसायकल विकल्याची कबुली दिल्यानंतर प्रशांत दीपक राजपूत यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. तसेच या गुन्ह्याशी संबंधित आणखी एका संशयित इसमाकडून दुसरी चोरीची दुचाकीही हस्तगत करण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण दोन मोटारसायकली जप्त केल्या असून, आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कामगिरीमुळे वाहनचोरांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



