जळगाव प्रतिनिधी | शहरातील तांबापुरा परिसरातील बिस्मिला चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिला आणि एका तरुणामधील किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास झालेल्या वादानंतर दोन्ही गटांतील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरांच्या काचा, दरवाजे व अन्य साहित्याची तोडफोड झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर तसेच काही पोलिस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तातडीने तैनात करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
या प्रकरणी दोन्ही गटांतील संबंधितांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दंगलीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरू होती. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच संपूर्ण घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.



