चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवरील अष्टभुजा कॉम्प्लेक्समधील अंबिका स्वीट या दुकानात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याची भावना व्यक्त होत असून, संबंधित प्रकाराची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून, त्याचवेळी खाद्यपदार्थांची निर्मिती व विक्री सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुरुस्तीदरम्यान फर्निचर व प्लायवूड कापण्याचे काम सुरू असल्याने धूळ, भुसा आणि इतर सूक्ष्म कण खाद्यपदार्थांवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत हे पदार्थ ग्राहकांनी सेवन केल्यास पोटाचे विकार, श्वसनाचे त्रास तसेच इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अन्न सुरक्षा नियमांनुसार खाद्यपदार्थ स्वच्छ, सुरक्षित आणि झाकून ठेवणे आवश्यक असते. मात्र संबंधित ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पडताळणी करावी, आवश्यक नमुने तपासणीसाठी घ्यावेत आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित व्यावसायिकांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाच्या चौकशीनंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



