अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) आणि आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून रोजी भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला..
या शिबिरामध्ये एकूण ७३ नागरिकांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विजय बामणे, डॉ. गुरुप्रीत सिंग, डॉ. राहुल पाटील, डॉ. भूपेंद्र वाघ यांच्यासह निशा शिंदे व प्राची गायकवाड यांच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांची सखोल तपासणी केली. तपासणीअंती ३९ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. तत्पूर्वी, उपस्थित रुग्णांच्या हस्ते सर्व नेत्रतज्ज्ञांचा सन्मान करण्यात आला.
शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्व ३९ रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदी पूर्ण केल्यानंतर, त्यांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठवण्यात आले. संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या खास वाहन व्यवस्थेद्वारे हे रुग्ण दुपारी साडेचार वाजता श्री मंगळग्रह मंदिरातून पनवेलकडे रवाना झाले. तेथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि पुढील उपचार केले जाणार आहेत.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अशा भव्य मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले जाते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त मंडळ आणि सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.



