रावेर प्रतिनिधी । राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले असून, रावेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नजरा आता नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर महाजन यांच्याकडे लागल्या आहेत. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला या अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्या व्यथा आणि वेदना आमदार महाजन यांच्या माध्यमातून थेट विधिमंडळात मांडल्या जातील आणि सरकारकडून ठोस मदत मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.
रावेर तालुका हा प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचे जगणे असह्य केले आहे. यंदाही पावसाच्या अनियमिततेमुळे विहिरींची पाण्याची पातळी कमालीची खालावली असून पिकांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी मदतीच्या आणि आधाराच्या नजरेने आपल्या लोकप्रतिनिधीकडे पाहत आहेत.
नंदकिशोर महाजन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गावच्या सरपंचपदापासून केली आहे. त्यानंतर पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक अशा विविध पदांवर काम केल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची खडान् खडा माहिती आहे. विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, वाढता उत्पादन खर्च, बाजारातील चढ-उतार आणि नैसर्गिक आपत्तींचे परिणाम यांची त्यांना सखोल जाण आहे.
४ जून रोजी झालेल्या भीषण वादळी पावसाने रावेर तालुक्यातील २ हजार ८५ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. चालू बाजारभावानुसार तब्बल ७०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेकांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळाने हिरावून घेतला, तर काहींची वर्षभराची मेहनत एका क्षणात मातीमोल झाली. आज रावेरचा शेतकरी केवळ तात्पुरत्या आर्थिक मदतीची अपेक्षा करत नसून, शासनाने केळी पिकाबाबत कायमस्वरूपी ठोस निर्णय घ्यावेत अशी त्याची मागणी आहे. तळागाळातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून आमदार नंदकिशोर महाजन हे या अधिवेशनात रावेरच्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करतील, असा विश्वास तालुक्यातील जनतेला वाटत आहे.



