जळगाव-प्रतिनिधी । मद्याच्या नशेत स्वतःवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला तोंडावर पडून एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर बारकू नारोळे (रा. खंडेरावनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुरुवातीला तरुणाच्या चेहऱ्यावरील गंभीर जखमा पाहून घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र पोलिसांनी केलेल्या कसून तपासात अतिमद्यसेवनामुळे तोल जाऊन पडल्यानेच हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना सोमवार, २२ जून रोजी सकाळी आशाबाबा नगरकडे येणाऱ्या रस्त्यावर समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर नारोळे हा गेल्या काही वर्षांपासून बाहेरगावी आपल्या नातेवाइकांकडे राहत होता. दोन दिवसांपूर्वीच तो जळगावात राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. रविवारी (२१ जून) रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वरने अतिप्रमाणात मद्यप्राशन केले. त्यानंतर तो शिवकॉलनीकडून आशाबाबा नगरच्या दिशेने पायी चालत जात असताना, अचानक त्याचा तोल गेला आणि तो रस्त्याच्या कडेला तोंडावर कोसळला. या अपघातात त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. रात्रीच्या वेळी या परिसरात अंधार असल्याने रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या ज्ञानेश्वरकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.
सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांना एक युवक गंभीर अवस्थेत पडलेला दिसताच त्यांनी तातडीने रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानेश्वरच्या चेहऱ्यावरील जखमांमुळे पोलिसांनी सुरुवातीला घातपाताच्या अँगलने तपास सुरू केला. यादरम्यान घटनास्थळी गर्दी झालेल्या नागरिकांनी आणि नातेवाइकांनी मयताची ओळख पटवली. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आई-वडिलांनी घटनास्थळी धाव घेऊन आक्रोश केला.
पोलीस तपासात समोर आले की, तोंडावर पडल्यामुळे ज्ञानेश्वरचे दोन्ही हात त्याच्या अंगाखाली दाबले गेले होते, ज्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत त्याला हालचाल करता आली नाही आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



