रावेर प्रतिनिधी । रावेर येथील पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत दोन अट्टल दुचाकी चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २५,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून, आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा ता. रावेर येथील रहिवासी अतुल अर्जुन महाजन (वय ४२) हे २३ जून रोजी दुपारी रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालय येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न आटोपून बाहेर आले असता, त्यांची १५,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉन मोटारसायकल (क्र. MH-19-DT-7111) चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
रावेर पोलीसांनी तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून खानापूर येथील दोन संशयितांची चौकशी केली आणि गुन्हे शोध पथकाने तात्काळ खानापूर येथे जाऊन समाधान उर्फ शंभू रमेश जाधव (वय ३३) आणि मनोज भागवत चंदनकर (वय ३९) या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीसांनी दुचाकी जप्त केली. दोघांची अजून कसून चौकशी सुरू आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान ठाकूर हे करीत आहे.



