जळगाव प्रतिनिधी । प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील सुरवाडा येथील रहिवासी डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना यंदाच्या प्रतिष्ठेच्या ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर नुकताच हा दिमाखदार सोहळा पार पडला.
अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्याज फाउंडेशन’ आणि ‘भारतीय जैन संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत संघर्ष करून यश मिळवणाऱ्या निवडक व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस आणि भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलालजी मुथा आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते डॉ. चौधरी यांना हा मानाचा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला.
डॉ. प्रीतीश चौधरी हे ‘दादाश्री विश्व ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून जळगाव जिल्हा व परिसरात अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कामे केली जातात. विशेषतः ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात संस्थेने मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या याच निरंतर समाजसेवेची दखल घेत २०२६ सालच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली भावना व्यक्त करताना डॉ. प्रीतीश चौधरी म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या संपूर्ण टीमच्या कष्टाचे फळ आहे. या सन्मानामुळे मला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळेल. समाजातील शोषित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.” डॉ. चौधरी यांच्या या यशामुळे सुरवाडा गावासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



