जळगाव : छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी संस्थेमार्फत राज्यभर ‘कृषी मित्र’ पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जळगावातील एका महाविद्यालयात झालेल्या या परीक्षेसाठी जिल्हाभरातील ३५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. मात्र परीक्षा सुरू होण्यापूर्वीच भरती प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने परीक्षास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला.
विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, ऑनलाइन अर्ज करताना दरमहा २५ हजार रुपये मानधन मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र परीक्षास्थळी संबंधित समन्वयकांनी ही नोकरी नसून कृषी उत्पादनांच्या विक्रीवर कमिशन मिळेल, अशी माहिती दिली. तसेच अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीटही देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास नकार देत भरलेली परीक्षा फी परत करावी आणि संबंधित कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस आणि जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित कंपनीच्या समन्वयकाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून प्राथमिक चौकशी सुरू केली. यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.
जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी सांगितले की, या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र शासनाच्या नावाचा किंवा कृषी विभागाच्या नावाचा गैरवापर झाला आहे का, याची पडताळणी सुरू आहे. संबंधित कंपनीकडून कृषी उत्पादनांशी संबंधित सर्व कागदपत्रे मागविण्यात आली असून ती बनावट अथवा दिशाभूल करणारी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांनीही फसवणुकीबाबत स्वतंत्रपणे पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून पुढील तपास सुरू आहे.



