जळगाव प्रतिनिधी | आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातून चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य भक्तिमय सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून उत्साहात पार पडला. जी.एस. ग्राऊंड ते जळगाव रेल्वे स्थानक हा संपूर्ण परिसर टाळ-मृदंग, अभंग, हरिनामाच्या गजराने आणि भगव्या पताकांनी दुमदुमून गेला.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि समतेची जिवंत परंपरा आहे. गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकऱ्यांना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर होते.
जी.एस. ग्राऊंडवर वारकऱ्यांची नोंदणी, ओळखपत्रे, प्रवास पास आणि आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यानंतर भव्य पालखी-दिंडीने रेल्वे स्थानकाकडे प्रस्थान केले. “ज्ञानोबा-तुकोबा”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” या अखंड जयघोषात वारकरी भक्तिरसात तल्लीन झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वतः टाळ हातात घेऊन दिंडीत सहभागी झाले तसेच रेल्वेच्या प्रत्येक डब्यात जाऊन वारकऱ्यांची विचारपूस करत सुविधांची पाहणी केली.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि जीपीएस मित्र परिवाराने केले. विशेष रेल्वेतील प्रत्येक डब्यात स्वयंसेवक, वैद्यकीय मदत, प्रथमोपचार पेटी, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. पंढरपूर येथे निवास, चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, महाप्रसाद, हरिपाठ आणि कीर्तनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सर्व वारकऱ्यांचा विमाही उतरविण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर मनोज चौधरी, विविध मान्यवर, संत-महंत, टाळकरी, माळकरी तसेच मोठ्या संख्येने महिला वारकरी उपस्थित होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून वारकऱ्यांना शुभेच्छांसह पंढरपूरच्या दिशेने निरोप दिला. संपूर्ण रेल्वे स्थानक “ज्ञानदेव… तुकाराम…” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामगजराने दुमदुमून गेले.



