जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्स येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरकडे पायी निघालेल्या या ऐतिहासिक पालखी सोहळ्याचे जैन हिल्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वारकरी परंपरेला साजेशा वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला.
अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी संत मुक्ताबाईंच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेत पालखीला अभिवादन केले. जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी विजय मुथा यांनी पालखीचे विधिवत पूजन करून वारकरी बांधवांचे स्वागत केले. याप्रसंगी एस. बी. ठाकरे, चंद्रकांत चौधरी, भीमराव दांडगे, किशोर पाटील आदींसह श्रीराम मंदिर संस्थान (आप्पा महाराज समाधी मंदिर) चे विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडला.
जैन इरिगेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीसोबत मालवाहू वाहन तसेच सजावट केलेले प्रवासी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. ही वाहने संपूर्ण वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत सोबत राहतात. कंपनीच्या या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाचे वारकरी व भाविकांकडून कौतुक करण्यात आले.
सन १७९४ पासून अखंड सुरू असलेल्या या पारंपरिक पालखी सोहळ्याला दीडशेहून अधिक वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. दरवर्षी जैन हिल्स येथे पालखीचे स्वागत करण्याची परंपराही कायम राखली जाते. यावेळी ह.भ.प. श्रीराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो वारकरी भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
या स्वागत सोहळ्यास जी. आर. पाटील, मनोहर बागुल, सुनील खैरनार, अभिजित शुक्ला, नितीन चोपडा, श्रेयस कुमट यांच्यासह श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि जैन इरिगेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जैन इरिगेशनच्या वतीने सर्व वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. मानव संसाधन, सुरक्षा आणि राजभोज खानपान विभागातील सहकाऱ्यांनी स्वागत सोहळ्याच्या नियोजनात मोलाचे योगदान दिले.



