जळगाव प्रतिनिधी । जागतिक योगदिनाचे औचित्य साधून जळगाव येथील सिद्धार्थ लॉनवर भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ योगशिक्षक श्री. सुनील गुरव यांनी उपस्थित सर्व योगसाधकांना आंतरराष्ट्रीय योग प्रोटोकॉलनुसार योगासने, प्राणायाम, ध्यान आणि हास्य प्रयोगांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. या विशेष प्रसंगी योगसाधकांनी केवळ एकट्याने न येता, आपल्या संपूर्ण कुटुंबासह (फॅमिलीसह) हजेरी लावली होती. यामध्ये सुमारे १०० हून अधिक योगप्रेमी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सिद्धार्थ लॉन येथे गेल्या १५ वर्षांपासून योगशिक्षक सुनील गुरव यांच्या माध्यमातून नियमित योगासने आणि प्राणायामचे वर्ग मोफत चालवले जातात. जळगाव शहरातील नागरिकांना निरोगी, सुदृढ आणि आनंदी जीवन जगता यावे, यासाठी ते सातत्याने योगाचे महत्त्व पटवून देत दैनंदिन योगाभ्यास करून घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला जळगावकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
विशेष म्हणजे, या दैनंदिन वर्गांमध्ये समाजातील सर्व स्तरांतील नागरिक एकत्र येतात. यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, सेवानिवृत्त प्राचार्य, चार्टर्ड अकाउंटंट (सीए), कारखानदार आणि व्यापारी वर्गाचा समावेश आहे. रोज सकाळी एकत्र येऊन हे सर्व जण योगाभ्यास करतात आणि तणावमुक्त, सुखी जीवन जगत आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी योगशिक्षक सुनील गुरव यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “करो योग, रहो निरोग” असा संदेश दिला. तसेच, प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून दररोज किमान काही वेळ योगासने आणि प्राणायामासाठी काढून निरोगी व आनंदी जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. या योगदिनाच्या कार्यक्रमामुळे परिसरात आरोग्याचा एक नवा उत्साह पाहायला मिळाला.



