भुसावळ प्रतिनिधी । पत्रकारांशी संवाद साधताना ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष खंडू शेलोडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व पत्रकारांनी २९ जून रोजी भुसावळ येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित खासदारांविरुद्ध चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात पत्रकारांचा सन्मान अबाधित राखणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यांच्याविषयी लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने व संयमित भाषा वापरणे अपेक्षित असल्याचेही संघाने अधोरेखित केले. संबंधित वक्तव्यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या असून संपूर्ण पत्रकारितेचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी पत्रकार मनोहर लोणे, शाम गोविंदा, कमलेश चौधरी, सुनिल आराक, जोएब सय्यद, आकाश ढाके, विनोद गोरधे, राजू चौधरी, किशोर सावळे, गोपी अण्णा, कलीम पायलट, सद्दाम खाटीक, रफिक खान, नईम शेख, किशोर शिंपी, प्रेम परदेशी यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
याप्रसंगी मनोहर लोणे, सुनिल आराक, राजू चौधरी आणि जोएब सय्यद यांनी मनोगत व्यक्त करत अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. तसेच पत्रकारांना धमक्या, अवमान किंवा दडपशाहीला सामोरे जावे लागू नये यासाठी आवश्यक सुरक्षा व संरक्षणाची हमी देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा मराठी पत्रकार संघाने व्यक्त केली.



