जामनेर (प्रतिनिधी) । तालुक्यातील गारखेडा येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाब्दिक वादाचे पर्यावसान थेट जीवघेण्या हाणामारीत झाले असून, आरोपींनी पती-पत्नीला चाकू आणि फायटर सारख्या धारदार हत्यारांनी बेदम मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गारखेडा येथील रहिवासी आणि मजूर व्यावसायिक सूरज शांताराम चौधरी (वय ३२) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. २८ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सूरज चौधरी यांच्या घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावरून निलेश हरिदास चौधरी, साई निलेश चौधरी, नैतिक निलेश चौधरी, विद्या निलेश चौधरी आणि कल्पनाबाई हरिदास चौधरी (सर्व राहणार गारखेडा, ता. जामनेर) यांनी सूरज यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा शाब्दिक वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि आरोपींनी हिंसक वळण घेतले. आरोपींनी सूरज चौधरी यांच्यावर चाकू सारख्या धारदार हत्याराने आणि फायटरने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर, वाद सोडवण्यासाठी आणि पतीला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या सूरज यांच्या पत्नीलाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी सूरज चौधरी यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



