वरणगाव प्रतिनिधी | शहरासह ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतातील ट्रान्सफॉर्मर वारंवार जळणे, कमी दाबाने वीज मिळणे, अवाजवी वीजबिले आणि स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रस्तावाविरोधात शिवसेनेच्या वतीने मंगळवारी वरणगाव वीज वितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो नागरिक, शेतकरी, महिला, युवक तसेच शिवसैनिक सहभागी झाले होते.
सकाळी १० वाजता बसस्टँड येथील शिवसेना संपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. भगवे झेंडे हातात घेऊन आणि घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी वीज वितरण कार्यालय गाठले. शहर व परिसरातील सुमारे ४०० ते ५०० नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवून वीज समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
वीज वितरण कार्यालयासमोर शिवसैनिकांनी सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपकार्यकारी अभियंता एस. सी. पंचबुधे, शहर अभियंता ए. बी. कुंभारे तसेच वरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वाढीव वीजबिलांची तपासणी करून योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल, शेतातील जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्यात येतील, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील आणि सध्या स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांच्या भावना लक्षात घेतल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले.
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शिवसेनेने आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात कामगार नेते मिलिंद मेढे, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.



