जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत अटक केलेल्या 11 आरोपींना न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी तिघे अल्पवयीन असल्याने त्यांना बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशपाक तडवी हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून रोजी संबंधित महिला तिच्या मित्रासोबत जंगल परिसरात थांबलेली असताना आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर दोघा आरोपींनी महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. या अमानुष कृत्याचे चित्रीकरण अन्य दोन आरोपींनी मोबाईलवर केले. पुढे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याने या गंभीर घटनेची माहिती 29 जून रोजी समोर आली. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून 15 संशयितांपैकी 14 जणांना अटक केली.
न्यायालयीन प्रक्रियेनुसार 11 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, अल्पवयीन आरोपींवर बालन्याय कायद्यानुसार स्वतंत्र कारवाई होणार आहे. फरार असलेल्या मुख्य आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस करत आहेत.



