भुसावळ प्रतिनिधी | रेल्वे रुळाशेजारी आढळलेल्या संतोष रघुवीर मंचाल यांच्या हत्येचा भुसावळ शहर पोलिसांनी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप चोरी करण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेरे यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २८ जून रोजी रात्री भुसावळ शहराजवळील रेल्वे मार्गालगतच्या दुर्गम ठिकाणी संतोष मंचाल यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटनास्थळी कोणतेही हत्यार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा तांत्रिक पुरावे नसल्याने तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरला.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. मानवी गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात जबडा व बरगड्यांवर झालेल्या जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कोणतेही हत्यार न वापरता मारहाण करण्यात आल्याने पोलिसांनी संशयाची दिशा बदलली. त्याचवेळी घटनेच्या रात्री एका हळदी समारंभात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. त्यामध्ये बॉक्सर म्हणून ओळखला जाणारा हर्षल राजू वर्मा एका व्यक्तीला मारहाण करताना दिसून आला.
या धाग्यावरून पोलिसांनी हर्षल वर्मा याच्यासह क्षितिज संजय भालेराव व प्रफुल उत्तम जाधव यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप चोरी करत असताना संतोष मंचाल यांनी विरोध केल्याने वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या मारहाणीत संतोष मंचाल यांचा मृत्यू झाल्याची कबुली आरोपींनी दिली.



