जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८७ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी ३० हजार रुपयांचा समावेश आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश श्रीराम ठाकूर (वय ५४, रा. शिवा अपार्टमेंट, शिव कॉलनी, जळगाव) यांचे पिंप्राळा येथील मयूर कॉलनीत घर आहे. २८ जून रोजी दुपारी १:३० वाजेपासून ते १ जुलै रोजी सकाळी ८:४० वाजेच्या दरम्यान फिर्यादींचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे विविध दागिने, ज्यात सोन्याचे दाणे, सोन्याची पाने, २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, १० हजार रुपयांचे सोन्याचे पदक, कानजुवे, सोन्याची अंगठी, १५ हजार रुपयांचे पेडेंट, तसेच चांदीचे शिक्के व जोडवी असा एकूण सोन्या-चांदीचा ऐवज आणि कपाटातील रोख ३० हजार रुपये असा एकूण ८७ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
घरफोडी झाल्याचे लक्षात येताच शैलेश ठाकूर यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.



